होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.
फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीच दुसरं नांव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो.
होळी आली की होळीसाठी लाकडं गवऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात.
“होळी रे होळी पुरणाची पोळी” ..
किंवा
“होळीला गवऱ्या पाच पाच….. डोक्यावर नाच नाच”…
लाकडं गवऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणांत किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं गोवऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी. मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे. होळी आपल्याला त्याग आणि समर्पण शिकवते. ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत