Total Pageviews

Wednesday, 30 July 2014

श्रावण महिना

श्रावण : हिंदू कालगणनेनुसार हा पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा आसपास श्रवण नक्षत्र असते म्हणून या महिन्याचे नाव श्रावण पडले आहे. या महिन्यात सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो. या महिन्यात हिंदूंची वतवैकल्ये व सण सर्वाधिक असल्याने चातुर्मासातील या महिन्याला सर्वांत जास्त धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या महिन्यात प्रत्येक वाराला काही ना काही व्रत असते. सोमवारी शिवपूजा व अर्धा उपवास करतात; तसेच नववधू तांदूळ, तीळ, मूग, जवस व सातू या धान्यांची शिवामूठ सोमवारी शिवाला वाहतात. मंगळवारी नववधू मंगळागौरीची पूजा करुन हा दिवस विविध वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळून साजरा करतात. बुधवारी बुधाची तर गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात. शुकवारी गौरीची पूजा करतात, सवाष्णीला भोजन देतात व त्याचप्रमाणे सुवासिनींना दूध-फुटाणे देऊन हळद-कुंकू लावतात. शनिवारी शनी, मारुती, नरसिंह व पिंपळ यांची पूजा करतात आणि मुंजा मुलास स्नान घालून भोजन देतात. रविवारी सूर्याची पूजा ( आदित्यपूजन ) करुन त्याला खिरीचा नैवद्य दाखवितात. श्रावण महिन्यात अनेक सण असतात. उदा., शुद्घ पंचमीला नागपंचमी म्हणतात. त्या दिवशी नागाची पूजा करुन त्याला दूध देतात. पौर्णिमेला समुद्रकिनारी वरुणाला प्रसन्न करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करतात. यावरुन नारळी पौर्णिमा हे नाव आले आहे; तर या दिवशी बहीण भावाला राखी बांधते म्हणून या दिवसाला रक्षाबंधन वा राखी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी सुताची पोवती पण हातात बांधण्याची प्रथा असल्याने पोवती पौर्णिमा हेही नाव या दिवसाला आहे. पौर्णिमेस श्रवण नक्षत्र असल्यास उपाकर्म करुन पुरुष नवीन यज्ञोपवीत ( जानवे ) धारण करतात. या विधीला श्रावणी म्हणतात.

No comments:

Post a Comment