दहीहंडी :-
गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी ठिकठिकाणी
उंचावर मडक्यात दही ठेवून, मडके दोरीने
उंचावर बांधतात. तरुणांनी एकमेकांच्या आधाराने
मानवी मनोरा करून ते मडके (हंडी) फोडण्याची
एक प्रथा आहे. त्याला ‘दहीहंडी’ म्हणतात.
अलीकडे ‘दहिहंडी’ हा एक `आंतरराष्ट्रीय
इव्हेंट' बनला आहे. मानवी मनोरा करणारे, हंडी
फोडणारे ‘गोविंदा’ यांची फार चढाओढ सुरू झाली
आहे. तरुणांची संघटित शक्ती ही या उत्सवाची
प्रमुख जमेची बाजू आहे. मुंबई हे या उत्सवाचे
मोठे, प्रमुख केंद्र आहे. श्रीकृष्ण म्हणजे
खट्याळ, खोडकर, दही-दूध- लोणी चोरून
खाणारा अशी त्याची प्रतिमा पिढ्या-न- पिढ्या
सांगितली जाते. अनेक गाणी- गोष्टी त्याच्या या
लीलांवरच रचलेल्या आहेत. श्रीकृष्णाने त्याच्या
सवंगड्यांसह, मनोरे करून दही- दूध-लोण्याच्या
हंड्या फोडल्याच्या कथा प्रचलित आहेत. अशा
श्रीकृष्णाची-आठवण करण्याचा हा दिवस. काही
कथांमुळे श्रीकृष्णाची प्रतिमा लहानपणापासून
प्रत्येकाच्या मनात तयार होते. तरुणांनी
चपळाईने, संघटितपणे उंचावरचे दही खाली
काढण्याच्या निमित्ताने साहसी वृत्ती जागवावी
अशाही पद्धतीने या उत्सवाकडे पाहिले जाते.......